Ad will apear here
Next
विद्यार्थ्यांनी अनुभवला दाभोळ खाडीचा प्रवास
‘वाशिष्ठी सफर : उगम ते संगम’ या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमाची सांगता
वाशिष्ठीचे विहंगम पात्र (छाया : धीरज वाटेकर)

चिपळूण : येथील मिरजोळी शिक्षण प्रसारक मंडळाच्या दलवाई हायस्कूलच्या सुवर्णमहोत्सवी वर्षपूर्तीनिमित्ताने ‘वाशिष्ठी सफर : उगम ते संगम’ या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याची सांगता नऊ डिसेंबर २०१८ रोजी झाली. दिवसभरात विद्यार्थ्यांनी जगप्रसिद्ध दाभोळ खाडीचा प्रवास अनुभवला आणि त्यातील निसर्ग, पर्यावरण, संस्कृती, सामाजिक स्थिती, लोकांचे जीवनमान समजून घेण्याचा प्रयत्न केला. शालेय शिक्षण घेणाऱ्या ६६ विद्यार्थ्यांना एकाच वेळी त्यांचे पोषण करणाऱ्या नदीची ‘उगम ते संगम’ अशी अभ्यासपूर्ण सफर यशस्वी होणारा, संपूर्ण महाराष्ट्र राज्याच्या शैक्षणिक इतिहासातील हा आगळावेगळा आणि वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम ठरला आहे.

बोट प्रवासास निघालेले विद्यार्थी

मुंबईतील मानस संस्था आणि ग्लोबल चिपळूण टुरिझम या संस्थांच्या माध्यमातून हा उपक्रम झाला. या उपक्रमाची संकल्पना ‘मानस’च्या कार्याध्यक्षा शमा दलवाई यांची होती. पर्यटन अभ्यासक, वाशिष्ठी नदीच्या उगमाचे शोधकर्ते धीरज वाटेकर हे या उपक्रमाचे समन्वयक होते. विद्यार्थ्यांनी केरळच्या बॅकवॉटरचा आनंद, रम्यखाडी, संथपाणी, टिपिकल किनारवर्ती गावे, किनाऱ्याला बिलगलेले डोंगर, मध्येच पसरलेली छोटी-छोटी बेटे, त्यांचे पाण्यात पडलेले प्रतिबिंब, विविध प्रकारच्या पक्ष्यांची ये-जा आणि प्राचीनता या दरम्याने अनुभवली.

संस्थेच्या प्रतिनिधींना माहिती देताना नीलेश बापट.

नोव्हेंबर महिन्यात विद्यार्थ्यांनी वाशिष्ठी उगमाचा ट्रेक यशस्वी केला होता. त्यानंतर करंबवणे ते मालदोली असा पहिल्या टप्प्यातील बोट प्रवास करण्यात आला. मालदोली धक्का येथील संदेश आणि शैलेश संसारे बंधूंच्या ‘कोकण हेरिटेज’ प्रकल्पावर हा कार्यक्रम झाला. या वेळी संस्थेचे अध्यक्ष खासदार हुसेन दलवाई, शमा दलवाई, विजया चौहान, सुमती जांभेकर, शीला मुखर्जी, इला दलवाई-कांबळी उपस्थित होत्या.

वन्यजीव अभ्यासक नीलेश बापट यांनी सह्याद्रीतील वन्यजीवनाबाबत माहिती दिली. ब्ल्यू मॉर्मन फुलपाखरु, जंगल, नैसर्गिक समतोलासाठी आवश्यक असलेली खारफुटी, जंगलात प्राण्यांना खारे पाणी मिळावे म्हणून चिखल किंवा चाटणयुक्त जागा, मीठाचे खडे, मातीतील क्षार, दांडेलीतील ८००-८५० वर्ष जुना बकुळ, अन्नासाठी २३ हजार ५०० किलोमीटर प्रवास करणारा पक्षी बारटेल गॉडविल यांची माहिती बापट यांनी दिली. संदेश संसारे यांनी खाडी किनाऱ्यावरील आपल्या पाच पिढ्यांच्या व्यवसाय आणि परिसरातील इतिहासाची माहिती दिली. सन १९७८ पासून या खाडीत मगरी दिसत असल्याचे संसारे यांनी सांगितले. लोटे सीईटीपीचे पाणी शुद्ध करून समुद्रात सोडण्यासाठीची २५ कोटी रूपये अंदाजपत्रक असलेली नवी पाईपलाइन मंजूर झाल्याची माहिती या वेळी खासदार दलवाई यांनी दिली. सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक वाटेकर यांनी केले.

भडवळे ग्रामस्थांशी संवाद साधताना विद्यार्थी

संगम उपक्रमाचा दुसरा टप्पा नऊ डिसेंबरला उत्साही वातावरणात झाला. या वेळी करंबवणे-चिवेली-भडवळे-पांगरी हवेली-भारती शिपयार्ड-दाभोळ बंदर असा बोट प्रवास झाला. विद्यार्थ्यांनी किराणा व्यावसायिक श्रीकांत लाड (करंबवणे), रामचंद्र पावसकर, सखाराम मिंढे (भडवळे-भोईवाडी), माजी सरपंच इक़्बाल दळवी, ८१ वर्षांचे हमदा शेख अहमद गोलंदाज यांच्यासह हासन शेख अहमद गोलंदाज, शौकत गोलंदाज, अब्दुल लतीफ अब्दुल्ला गोलंदाज (पांगारी-हवेली) यांच्याशी संवाद साधला. या संवादातून मुलांना या गावांची नव्याने ओळख झाली.

पांगरी-हवेली येथील विद्यार्थी ग्रामस्थ संवाद

बंदरावर विद्यार्थ्यांनी माशांचा व्यापार आणि इतिहासप्रसिद्ध माँसाहेबांची मशीद पाहिली. दाभोळमधील जुन्या वास्तूंमध्ये चांगल्या स्थितीमध्ये असलेली ही भव्य मशीद विजापूर येथील शाही जामा मशिदीची प्रतिकृती आहे. प्रशस्त दगडी पायऱ्या, जोत्याच्या पोटातील खोल्यांची रचना, मशिदीसमोर मोठया चौथऱ्याच्या मधोमध असलेले कारंजे याबाबत मुलांना माहिती देण्यात आली. मशिदीबाबतची आधी माहिती देताना वाटेकर म्हणाले, ‘विजापूरची राजकन्या आयेषाबिबी (माँसाहेब) सन १६५९ मध्ये मक्केला जाण्यासाठी दाभोळला आली होती. हवामान ठीक नसल्याने तिचा पुढील प्रवास होऊ शकला नाही. घोडेस्वार, फार मोठा लवाजमा, लाखो रूपयांची संपत्ती होती. प्रवास रद्द झाल्यावर काय करावे, अशा विचारात असताना मौलवींनी सोबतचे धन धार्मिक कार्यासाठी खर्च करण्याची सूचना केली. तेव्हा या मशिदीचे काम हाती घेऊन चार वर्षांत पूर्ण केले गेले. कामीलखान नावाच्या शिल्पकाराने ही मशीद बांधली. याला अंडा मशीद असेही म्हणतात.’

इतिहासप्रसिद्ध मॉंसाहेबांची मशीद येथे विद्यार्थी

यानंतर सूर्यास्तसमयी सायंकाळी दाभोळच्या बंदरावर या उक्रमाचा समारोप झाला. या वेळी पहिल्यांदाच बोटीतून एवढा प्रवास केलेल्या श्रीया कांबळी, स्नेहा कदम, कौशल वरपे या विद्यार्थ्यांनी, शिक्षिका संध्या बोराटे, शिक्षक रोहित जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. विकासाचा असमतोल, उगमाकडचे छोटेसे पात्र पुढे मोठे कसे झाले याची अनुभूती या उपक्रमातून विद्यार्थांना घेता आल्याचे शिक्षकांनी या वेळी नमूद केले.

इतिहासप्रसिद्ध मॉंसाहेबांची मशीदीची माहिती देताना धीरज वाटेकर

समारोप प्रसंगी मुख्याध्यापक रामचंद्र महाडिक यांनी संपूर्ण उपक्रमाचा आढावा घेतला. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणारे सर्व संस्थाचालक, शिक्षक, ग्लोबल चिपळूण टुरिझम, मानस संस्थेच्या सदस्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. समारोप कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना दाभोळच्या इतिहासाविषयी वाटेकर यांनी माहिती दिली. ते म्हणाले, ‘प्राचीनकाळी दालभ्य ऋषींच्या नावावरून याला दाभोळ नाव पडले असे मानले जाते. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर दाभोळइतके जुने आणि प्रसिद्ध बंदर नव्हते. टॉलेमीच्या सर्वात जुन्या नकाशात दाभोळचा उल्लेख आहे. दाभोळ प्राचीनकाळी दालभ्यवती, महिकावती, हामजाबाद, मैमुनाबाद नावाने ओळखली गेली. दक्षिण भारतातील बहुसंख्य मुसलमान यात्रेकरू मक्केला जाण्यासाठी दाभोळ बंदारात येत असत. इथला तलम वस्त्रांचा व्यापार मोठा होता. १९ व्या शतकापर्यंत इथला साळीवाडा गजबजलेला होता.’

दाभोळ बंदरावर माशांचा व्यापार पाहाताना विद्यार्थी

या जगप्रसिद्ध खाडीतील फेरफटका मिरजोळी शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी समृद्ध जीवनानुभव ठरल्याची भावना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसून आली. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी मानस संस्थेच्या चिपळूणच्या कार्याध्यक्षा सुमती जांभेकर, शाळा समिती अध्यक्ष खालिद दलवाई, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष रवींद्र पवार, उपाध्यक्ष प्रकाश खेडेकर, मुख्याध्यापक रामचंद्र महाडिक, सर्व संस्थाचालक, शिक्षक आणि कर्मचारी यांच्यासह उपक्रमाचे संयोजक ग्लोबल चिपळूण टुरिझम संस्थेचे अध्यक्ष श्रीराम रेडीज, व्यवस्थापक विश्वास पाटील, नामवंत वन्यजीव अभ्यासक नीलेश बापट, सदफ कडवेकर, राणी प्रभुलकर, विक्रांत प्रभुलकर, विलास महाडिक यांनी परिश्रम घेतले.

समारोपास उपस्थित संयोजक,शिक्षक आणि विद्यार्थी

दाभोळचा सर्यास्त
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/QZUEBV
Similar Posts
वाशिष्ठी बॅकवॉटरची रम्य सफर! चार मे २०१९पासून रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमधील वाशिष्ठी खाडीत ‘समर बोटिंग आणि क्रोकोडाइल सफारी’ सुरू होत आहे. त्या निमित्ताने, वाशिष्ठी खाडीचे ऐतिहासिक, भौगोलिक महत्त्व, त्या भागातील निसर्गसौंदर्य, प्राणिसंपदा, पक्षीसंपदा आणि वनसंपदा, वारसा वास्तू अशा विविध अंगांनी माहिती देणारा आणि ‘क्रोकोडाइल सफारी’चे वेगळेपण सांगणारा हा लेख
रमणीय रत्नागिरी – भाग ६ (दापोली तालुका) ‘करू या देशाटन’ सदराच्या गेल्या भागात आपण रत्नागिरीच्या दापोली तालुक्याच्या किनारपट्टीवरचा उत्तर भाग पाहिला. आजच्या भागात पाहू या त्या तालुक्याच्या उर्वरित भागातील ठिकाणे...
‘ग्लोबल चिपळूण’तर्फे ‘जलपर्यटन आणि क्रोकोडाइल सफारी’चे आयोजन चिपळूण : येथील वाशिष्ठी नदीच्या तीरावर, शहराचा पहारेकरी असलेल्या किल्ले गोविंदगडाच्या पायथ्याशी, गोवळकोट धक्का परिसरात ‘ग्लोबल चिपळूण टुरिझम मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी’ने २२ ते २६ डिसेंबर २०१८ या कालावधीत ‘चिपळूण बॅकवॉटर फेस्टिव्हल आणि क्रोकोडाइल सफारी २०१८’ हा महोत्सव आयोजित केला आहे.
‘सागरपुत्र’च्या माजी विद्यार्थ्यांच्या कृतज्ञतेने सभागृह भारावले दापोली : ‘आदरणीय अण्णा! आम्ही तुमचे सागरपुत्र आणि कोकणकन्या आज या समारंभातून तुमचं आमच्यावर असलेलं मोठं ऋण अंशतः फेडत आहोत. आम्हाला काहीसं ऋणमुक्त होऊ द्या. तुमचं ध्येय, स्वप्न होतं सागरपुत्र विद्याविकास संस्था. तुम्ही सर्वस्व ओतलंत त्यासाठी...!’ अशा आशयाच्या कृतज्ञता पत्राचे वाचन व्यासपीठावरून सुरू

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language